1999 नंतर भारतीय महिला संघाला प्रथमच मालिकाविजयाची संधी
कॅन्टर्बरी / वृत्तसंस्था
पहिल्या वनडेतील दमदार विजयानंतर मनोबल उंचावलेला भारतीय महिला संघ आज (दि. 21) इंग्लिश महिला संघाविरुद्ध दुसऱया वनडेतही तीच घोडदौड कायम राखत ऐतिहासिक मालिकाविजयासाठी सर्वस्व पणाला लावेल, अशी अपेक्षा आहे. भारताला 1999 नंतर प्रथमच इंग्लिश भूमीत मालिकाविजयाची संधी असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाणार आहे.
यापूर्वी, टी-20 मालिकेत 1-2 अशा फरकाने पराभव पत्करावा लागल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या वनडेत तिन्ही आघाडय़ांवर उत्तम वर्चस्व गाजवत 7 गडी राखून सहज विजय संपादन केला. केवळ तीन दिवसांच्या अंतरात त्यांनी मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली होती.
वास्तविक, इंग्लंडचा संघ काही वरिष्ठ खेळाडूंविना खेळत आहे. पण, तरीही पहिल्या वनडेत भारतीय संघ सर्व आघाडय़ांवर अधिक सरस भासला आणि आता हीच घोडदौड कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यापूर्वी, 1999 मध्ये अंजुम चोप्राने एक शतक व एक अर्धशतक झळकावल्यानंतर भारताने वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. या मालिकेनंतर भारतीय संघ जून 2023 पर्यंत एकही वनडे मालिका खेळणार नाही. त्यामुळे, अनुभवी झुलन गोस्वामीसाठी ही निरोपाची मालिका असणार आहे.
मार्चनंतर प्रथमच मैदानात उतरत असलेल्या 39 वर्षीय झुलन गोस्वामीच्या खात्यावर सर्वाधिक बळींचा विक्रम असून पहिल्या वनडेत तिने 10 षटकात 2 निर्धाव व 20 धावात 1 बळी, असा अतिशय किफायतशीर मारा केला. उपकर्णधार स्मृती मानधनाने 99 चेंडूत 91 धावांची शानदार खेळी साकारत आपला फॉर्म अधोरेखित केला. यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटियाने तडफदार अर्धशतक साजरे केले तर कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 74 धावांसह विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
आजच्या लढतीत मध्यफळीतील फलंदाजांनी अधिक तडफेने फलंदाजी करणे भारतीय संघव्यवस्थापनाला अपेक्षित असेल. मागील 10 डावात अगदी एकही अर्धशतक न झळकावणाऱया शफाली वर्माला सूर सापडणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, इंग्लिश संघ देखील आपल्या फलंदाजांवर अवलंबून असेल. बहरातील सोफिया डंकलीवर त्यांची बरीच भिस्त असणार आहे. डंकली व ऍलाईस कॅप्से आणखी एकदा धोकादायक डाव साकारु शकतात. यापूर्वी हरमनप्रीतने एकहाती अप्रतिम झेल टिपत त्यांची जोडी फोडली होती. आज दुसरी लढत जिंकल्यास भारताला वनडे क्रिकेटमधील गतवैभव प्राप्त करण्याच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण यश मिळू शकेल.
संभाव्य संघ
भारत ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, सब्बिनेनी मेघना, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, रेणुका ठाकुर, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज.
इंग्लंड ः ऍमी जोन्स (कर्णधार व यष्टीरक्षक), टॅमी ब्यूमाँट, लॉरेन बेल, माईया बॉशियर, ऍलाईस कॅप्से, केट क्रॉस, प्रेया डेव्हिस, ऍलाईस डेव्हिडसन-रिचर्ड्स, चार्ली डीन, सोफिया डंकली, सोफी इक्लेस्टोन, प्रेया केम्प, इस्से वाँग, डॅनी वॅट.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः दुपारी 3.30 पासून.
ताज्या मानांकन यादीत स्मृती मानधनाची उत्तुंग झेप

दुबई ः भारताची दिग्गज सलामीवीर स्मृती मानधनाने वनडे व टी-20 क्रिकेटमधील ताज्या मानांकन यादीत उत्तुंग झेप घेतली. डावखुऱया स्मृतीने पहिल्या वनडे सामन्यातील 91 धावांच्या खेळीनंतर सातव्या स्थानी झेप घेतली तर टी-20 मालिकेतील 111 च्या ऍग्रिगेटमुळे कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान संपादन केले.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर देखील वनडे मानांकनात चार अंकांनी स्थान उंचावत नववा क्रमांक मिळवला. अष्टपैलू दीप्ती शर्माने 32 वे तर यष्टीरक्षक यास्तिका भाटियाने 32 वे स्थान मिळवले. दीप्ती शर्माने गोलंदाजांच्या यादीत 12 वे स्थान प्राप्त केले.
इंग्लंडतर्फे इम्मा लॅम्ब व सोफी इक्लेस्टोन यांना फलंदाजीच्या मानांकन यादीत अनुक्रमे 64 व 72 व्या स्थानी समाधान मानावे लागले. चार्ली डीन 86 व्या स्थानी राहिली. गोलंदाजांमध्ये डीन 20 व्या स्थानी पोहोचली. केट क्रॉस सीम गोलंदाजीच्या बळावर 2 बळींसह पहिल्या दहामध्ये पोहोचली.
भारत-इंग्लंड टी-20 मालिकेनंतर भारताची कौल 14 व्या स्थानी, नव्या चेंडूवरील गोलंदाज रेणुका सिंग 10 व्या स्थानावर तर फिरकीपटू राधा यादव 14 व्या स्थानी पोहोचली. अष्टपैलू स्नेह राणा व पूजा वस्त्रकार संयुक्त 41 व्या स्थानी आहेत. इंग्लंडची सोफिया डंकली 32 व्या स्थानी तर ऍलाईस कॅप्से 20 व्या स्थानी आहे.









