वृत्तसंस्था / मुलानपूर (पंजाब)
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बुधवारी येथे दुसरा सामना खेळविला जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने आता त्यांना बुधवारच्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधण्यासाठी विजयाची नितांत गरज आहे. दरम्यान गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन विभागावर भारतीय खेळाडूंनी अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजी समाधानकारक केली होती. प्रतिका रावल, सलामीची स्मृती मानधना आणि हर्लिन देवोल यांनी अर्धशतके नोंदविली होती. पण या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण अत्यंत गचाळ झाले आणि गोलंदाजीही प्रभावी झाली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यात सहज विजय मिळविता आला. या पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंकडून ऑस्ट्रेलियाला चार जीवदाने मिळाली आणि तिच अखेर भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली. हरमनप्रित कौरच्या भारतीय महिला क्रिकेट संघाने अलिकडेच झालेल्या इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये वनडे तसेच टी-20 मालिकेत दर्जेदार कामगिरी केली होती.
चालु महिन्याच्या अखेरीस भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने आयसीसीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका विशेष महत्त्वाची राहील. अॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन महिला संघाने आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू केली आहे. या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 281 धावांचे आव्हान दिले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारताचे हे आव्हान स्वीकारुन विजय मिळविला. त्यामुळे बुधवारच्या सामन्यात आता ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय संघावर अधिक मानसिक दडपण राहील. ऑस्ट्रेलियन महिला संघाने आतापर्यंत आयसीसीच्या महिलांच्या 7 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्या आहेत. आता ते विक्रमी आठव्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतातील खेळपट्ट्या आणि वातावरण यांच्याशी ऑस्ट्रेलियन महिला संघाने चांगलेच जुळवून घेतल्याचे जाणवते. पहिल्या सामन्यात भारतीय संघात चार फिरकी गोलंदाजांना खेळविण्यात आले होते. पण स्नेह राणा वगळता दिप्ती शर्मा, श्रीचरणी आणि राधा यादव यांना मात्र एकही गडी बाद करता आला नाही. ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी भारतातील महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तसेच द्विपक्षीय मालिकेत खेळण्याची संधी गमविली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला त्याचा लाभ अधिक मिळत असल्याचे जाणवते.
ऑस्ट्रेलियाची उपकर्णधार ताहीला मॅकग्रा ही भारतीय दौऱ्यावर जाण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. ऑस्ट्रेलियन संघातील टी-20 आणि वनडे या प्रकारामध्ये अनुभवी खेळाडू अॅलिसा हिली, बेथ मुनी, लिचफिल्ड, इलेसी पेरी आणि सदरलँड यांनी या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात आक्रमक फटकेबाजी करत आपण आगामी आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहीमेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. पहिल्या सामन्यात इलेसी पेरीला दुखापतीमुळे 30 धावांवर निवृत्त व्हावे लागले होते. त्यामुळे ती आता बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
भारतीय संघातील मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ज, यष्टीरक्षक आणि फलंदाज रिचा घोष आणि दिप्ती शर्मा यांना अधिक धावा जमविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 281 धावांचे आव्हान दिले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या भक्कम फलंदाजीमुळे हे आव्हान त्यांना पुरेसे नसल्याचे दिसून आले. पहिल्या सामन्यात रावल आणि मानधना यांनी सलामीच्या गड्यासाठी 114 धावांची शतकी भागिदारी केली होती. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्या संघाला किमान 320 धावांचे लक्ष्य ठेवणे जरुरीचे आहे, असे कर्णधार हरमनप्रित कौरने म्हटले आहे. बुधवारच्या सामन्यात भारतीय संघ तिन्ही विभागात चांगली कामगिरी करण्यावर अधिक लक्ष देईल, अशी ग्वाही कर्णधार कौरने दिली आहे.
भारत संघ: हरमनप्रित कौर (कर्णधार), उमा छेत्री, हर्लिन देवोल, रिचा घोष, क्रांती गौड, स्मृती मानधना, प्रतिका रावल, स्नेह राणा, अरुंधती रे•ाr, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, सायली सातघरे, दीप्ती शर्मा, श्री चरणी आणि राधा यादव.
ऑस्ट्रेलिया संघ : अॅलिस हिली (कर्णधार), मॅकग्रा, ब्राऊन, फल्टम, गार्डनर, गार्थ, हॅरिस, किंग, नॉट, लिचफिल्ड, मॉलिन्युक्स, मुनी, एलीस पेरी, स्कट, सदरलँड, व्हॉल, व्हेरहॅम
सामन्याची वेळ दुपारी 1.30 वाजता









