वृत्तसंस्था/ मुंबई
सलग दोन कसोटी विजय नोंदवून उंच भरारी घेतलेल्या भारतीय महिला आता तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करतील आणि त्यांची निराशाजनक कामगिरी बदलू पाहतील. आज गुरुवारी या मालिकेतील पहिला सामना होईल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन ‘टी-20’ गमावल्यानंतर दोन कसोटी आणि एक टी-20 लढत जिंकून भारतीय संघ अव्वल फॉर्ममध्ये आला आहे.
इंग्लंडचा एकतर्फी कसोटीत विक्रमी 347 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर भारताने गेल्या आठवड्यात वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचे ठिकाणही तेच आहे. त्यांचा सध्याचा फॉर्म पाहता भारताचे लक्ष आणखी यश मिळविण्यावर असेल. परंतु हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला हेही माहीत असेल की, 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांच्यावर नेहमीच वर्चस्व गाजविलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान कठीण राहणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकूण 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला फक्त 10 विजय नोंदविता आले आहेत आणि 40 पराभव स्वीकारलेले आहेत, तर मायदेशात त्यांची कामगिरी त्याहून खराब आहे. 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त चार विजय त्यांना नोंदविता आले आहेत आणि 17 पराभव स्वीकारावे लागलेले आहेत. भारतला फेब्रुवारी, 2007 पासून घरच्या मैदानावर खेळलेल्या मागील सात सामन्यांपैकी एकाही सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवता आलेले नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मागील वेळी म्हणजे मार्च 2012 मध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये यजमानांना 221 धावांनी आणि पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता.
तथापि, भारताकडे यावेळी कर्णधार हरमनप्रीत आणि प्रशिक्षक अमोल मुजुमदार ही नवीन जोडी आहे. त्याशिवाय नवीन गुणवत्तेला संधी देण्यात आली असून श्रेयांका पाटील, सायका इशाक, मन्नत कश्यप आणि तितास साधू यांची पहिल्यांदाच वनडे संघात वर्णी लागली आहे. मात्र, बांगलादेशातील तीन सामन्यांत सहा बळी घेतल्यानंतरही वगळण्यात आलेल्या देविका वैद्यविना भारत उतरेल. भारताने यावर्षी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळलेला असून बांगलादेशमधील ही तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली.
जेमिमा रॉड्रिग्स या तीन सामन्यांमध्ये 129 धावांसह भारताची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे, तर ऑस्ट्रेलियासाठी हा मान डावखुरी सलामीवीर बेथ मुनी हिने मिळविला आहे. तिने 11 सामन्यांमधून एक शतक व दोन अर्धशतकांसह 387 धावा केल्या आहेत. त्यांच्या फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी यांनीही धावा केलेल्या असून नवीन कर्णधार अॅलीसा हिली आणखी एक मालिका विजय खात्यावर जमा करण्यास उत्सुक असेल. पाहुणा संघ यावर्षी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 21 बळी घेतलेल्या अॅश्ले गार्डनरवर बराच अवलंबून आहे.
संघ-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुकासिंह ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, हरलीन देओल.
ऑस्ट्रेलिया : अॅलीसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, हेदर ग्रॅहम, अॅश्ले गार्डनर, किम गर्थ, जेस जोनासेन, अॅलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मुना, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.
वेळ : दुपारी 1:30 वा.









