वृत्तसंस्था/ शारजाह
येथील अल हमरिया स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर बुधवारी झालेल्या पिंक लेडीज कप फुटबॉल लढतीत भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाला कोरियाकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताचा हा चौथा व शेवटचा सामना होता. फिफा मानांकनात 20 व्या स्थानावर असणाऱ्या कोरियाने पूर्वार्धातच 2-0 अशी आघाडी मिळविली होती. चोइ यूजुंगने आठव्या तर चोइ डॅगयेआँगने 27 व्या मिनिटाला हे गोल केले. मुन युन्जूने 81 व्या मिनिटाला कोरियाचा तिसरा गोल केला. पिंक लेडीज कप स्पर्धेत भारताने चार सामने खेळले, त्यातील सलामीच्या सामन्यात जॉर्डनवर 2-1 व नंतर हाँगकाँगवर 1-0 असा विजय मिळविला तर नंतरच्या सामन्यात रशिया (0-3) व कोरियाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. रशियाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या 17 मिनिटातच रशियाने 2 गोल नोंदवल्यानंतर उत्तरार्धात तिसरा गोल नोंदवला. भारताला या स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
अपेक्षेप्रमाणे कोरिया संघ भारतापेक्षा वरचढ ठरला. प्रारंभापासूनच त्यांनी भारताला आक्रमण करीत भारतीय हद्दीतच जास्त वेळ खेळ केला. क्रिस्पिन छेत्रीच्या भारतीय संघातील मुलींनी चांगली समज दाखवत लवकर गॅप भरून काढण्याचे काम केले. त्यामुळे कोरियन आक्रमणातील धारही काही प्रमाणात कमी झाली. मात्र कोरियन खेळाडूंना त्या जास्त वेळ रोखू शकल्या नाहीत.
सततच्या दबावामुळे भारतीय डिफेंडर्सकडून काही चुका झाल्या. त्यातील एका चुकीवर आठव्या मिनिटाला कोरियाचा पहिला गोल झाला. चोइ यूजुंग व कर्णधार ली यंगजू या त्यांच्या आक्रमणातील प्रमुख खेळाडू होत्या. यातील यूजेंगने हा पहिला गोल नोंदवला. बॉक्सच्या काठावर मिळालेल्या फ्री किकवर यूजुंगने जोरदार फटका मारत हा गोल केला. गोलरक्षक श्रेया हुडाला त्यावर काही करता आले नाही. मात्र श्रेयाची एकंदर कामगिरी चांगली झाली. तिने दक्ष राहून अनेक हल्ले थोवपले. तिने 66 व्या मिनिटाला एक पेनल्टीही थोपवली. मात्र 27 व्या मिनिटाला चोइ डॅगयेआँगने दुसरा गोल केला त्यावेळी ती काहीही करू शकली नाही.
भारतीय डिफेंडर्सनी चेंडू आपल्या हद्दीतच जास्त वेळ राहू देण्याची चूक केली, त्याचा त्यांना फटका बसला. डॅगयेआँगने अगदी जवळून हा गोल नोंदवला. भारताचे आक्रमणही कमी होते आणि त्यात जोरही नव्हता. भारताने काही कॉर्नर्स मिळविले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उत्तरार्धात थोडी सरस कामगिरी झाली, पण पराभव टाळण्यास ती पुरेशी ठरली नाही.









