ईश्वरी अवसरे, सानिका चाळके व भाविका अहिरे या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समोवश : 18 जानेवारीपासून मलेशियात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, क्वालालम्पूर
आयसीसी यू-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा नव्या वर्षात मलेशियात येथे होणार आहे. 18 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 16 संघाचा सहभाग राहणार आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी बीसीसीआयकडून मंगळवारी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. निकी प्रसादकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून महाराष्ट्राची सानिका चाळके उपकर्णधार असेल. विशेष म्हणजे, भारतीय संघात सानिका चाळके, ईश्वरी अवसरे व भाविका अहिरे या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून दि. 19 जानेवारी रोजी भारत व वेस्ट इंडिज महिला यांच्यात सलामीचा सामना होईल.
अलीकडेच दोनच दिवसापूर्वी 19 वर्षाखालील महिला संघाने आशिया चषक जिंकला आहे. जी. त्रिशाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्यावाहिल्या आशिया चषक स्पर्धेत शानदार कामगिरी केली. दरम्यान, आशिया चषकातील संघ टी-20 वर्ल्डकपसाठी कायम ठेवण्यात आला आहे. कमलिनी जी व भाविका अहिरे या दोन यष्टीरक्षक असतील. मुंबईकर सानिका चाळकेकडे उपकर्णधारपद देण्यात आले असून कोल्हापूरची अष्टपैलू खेळाडू ईश्वरी अवसरेचीही संघात वर्णी लागली आहे.
स्पर्धेत 16 संघांचा सहभाग
यू-19 महिला टी-20 विश्वचषक 2025 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होतील. ज्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारत हा गतविजेता आहे आणि यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसह अ गटात आहे. भारत 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यापासून मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर मलेशिया (21 जानेवारी) आणि श्रीलंकेविरुद्ध (23 जानेवारी) सामने खेळणार आहे. या स्पर्धेत 19 ते 23 जानेवारी दरम्यान ग्रुप स्टेजचे सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ 25 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. सुपर सिक्समध्ये प्रत्येकी सहा संघांचे दोन गट असतील. सुपर सिक्समधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. यानंतर 2 फेब्रुवारी रोजी फायनल होईल.
आयसीसी यू-19 महिला टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ –
निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उप कर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रिथि, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.









