वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत भुतानमधील थिम्पू येथे होणाऱ्या यू-17 सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक जोआकिम अलेक्झांडरसन यांनी 23 सदस्यीय महिला संघाची निवड केली आहे. अलेक्झांडरसन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या यू-20 महिला संघाने दोन दशकानंतर पहिल्यांदाच एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवित ऐतिहासिक यश मिळविले. आता ते आता यू-17 संघाला सॅफ चॅम्पियनशिपमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
येत्या ऑक्टोबरमध्ये किर्गीझ प्रजासत्ताक येथे एएफसी यू-17 महिला आशियाई चषक पात्रता स्पर्धा होणार आहे. त्यासाठी सॅफ स्पर्धा भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. नव्या फॉरमॅटनुसार होणाऱ्या सॅफ यू-17 महिला चॅम्पियनशिपमध्ये चार संघ सहभागी होणार आहेत. त्यात भारत, भुतान, नेपाळ, बांगलादेश यांचा समावेश असून दुहेरी राऊंडरॉबिन लीग पद्धतीने यातील सामने खेळविले जातील. प्रत्येक संघ सहा सामने खेळेल आणि सर्वाधिक गुण मिळविणारा संघ चॅम्पियनचा किताब मिळेल.
भारताची सलामीची लढत नेपाळविरुद्ध 20 ऑगस्टला होईल. त्यानंतर बांगलादेश (22 ऑगस्ट), भुतान (24 व 27 ऑगस्ट), नेपाळ (29 ऑगस्ट), बांगलादेश (31 ऑगस्ट) यांच्याविरुद्ध सामने होतील. सर्व सामने चांगलिमिथांग स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. 27 व 29 ऑगस्ट रोजी होणारे भारताचे सामने सायंकाळी 5.30 वाजता तर उर्वरित सर्व सामने दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहेत.
भारतीय महिला यू-17 संघ : गोलरक्षक-मुनी, सूजरमुनी कुमारी, तम्फासना देवी कोन्जेन्गबम. बचावपटू-अॅलेना देवी सारंगथेम, अलिशा लींगडोहृ बिनिता होरो, दिव्यानी लिंडा, एलिझाबेद लाक्रा, प्रिया, रितू बदैक, तानिया देवी तोनम्बम. मध्यफळी-अभिस्टा बासनेत, अनिता डुंगडुंग, बीना कुमारी, बोनिफिलिया शुलाइ, जुलन नाँगमैथेम, प्रितिका बर्मन, श्वेता राणी, थांडमोनी बास्के. आघाडी फळी-अनुष्का, कुमारी, निरा चानू लाँगजम, पर्ल फर्नांडेस, वलयना जडा फर्नांडेस.









