वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जूनमध्ये होणाऱ्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेच्या युरोपियन टप्प्यासाठी भारताने 24 सदस्यीय हॉकी संघाची घोषणा केली. मिडफिल्डर सलिमा टेटेला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया, अर्जेन्टिना, बेल्जियम व चीन यांच्याविरुद्ध दोन-दोन सामने लंडन, अँटवर्प, बर्लिन येथे 14 ते 29 जून या कालावधीत खेळविले जातील. अनुभवी आघाडीवीर नवनीत कौरला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संघात गोलरक्षक सविता व बिच्छू देवी खरिबम, अनुभवी सुशीला चानू, ज्योती, सुमन देवी थौडम, ज्योती सिंग, इशिका चौधरी व ज्योती छात्री या बचावफळीत खेळतील. मध्यफळीत वैष्णवी विठ्ठल फाळके, सुजाता कुजुर, मनीषा चौहान, नेहा, सलिमा, लालरेमसियामी, शर्मिला देवी, सुनेलिता टोपो, महिमा टेटे यांचा समावेश आहे. दीपिका, नवनीत, दीपिका सोरेंग, बलजीत कौर, रुतुजा दादासो पिसाळ, ब्युटी डुंगडुंग, साक्षी राणा यांची आघाडी फळीत निवड झाली आहे. राखील खेळाडूत गोलक्षक बन्सरी सोळंकी, बचावपटू अजमिना कुजुर यांना ठेवण्यात आले आहे.
‘प्रो लीगचा युरोपियन टप्पा फार महत्त्वाचा असून जगातील काही सर्वोत्तम संघाविरुद्ध उच्च दर्जाचा प्रतिकार व खेळ पहावयास मिळणार आहे. अलीकडेच झालेल्या सराव शिबिरात व ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण या लीगसाठी सज्ज असल्याचे आपल्या खेळाडूंनी दाखवून दिले आहे. भुवनेश्वरमध्ये झालेल्या प्रो लीग टप्प्यात आम्हाला आमची बलस्थाने व कच्चे दुवे यांची जाणीव झाली आहे,’ असे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग म्हणाले. भारताने दोन विजय, दोन अनिर्णीत सामन्यांत 9 गुण घेत क्रमवारीत सहावे स्थान मिळविले आहे.









