तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा भारतावर 4 गडी राखून विजय
वृत्तसंस्था /मीरपूर (बांगलादेश)
बांगलादेश आणि भारत यांच्यात खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान बांगलादेश महिला संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 फरकाने जिंकली आहे. वास्तविक, टीम इंडियाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात यजमान बांगलादेश संघाचा पराभव केला होता. शेवटच्या टी-20 सामन्यात बांगलादेशसमोर विजयासाठी 103 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात बांगलादेशने 18.1 षटकात 6 विकेट गमावत 103 धावा करून सामना जिंकला. शमिमा सुलतानाला सामनावीर तर हरमनप्रीत कौरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सुरुवातीला नाणेफेक जिंकत भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावत 102 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 41 चेंडूत 40 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तिने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर जेमिमा रॉड्रिग्जने 26 चेंडूत 28 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. शेफाली वर्माने 11 तर यास्तिका भाटियाने 12 धावा केल्या. विशेष म्हणजे, टीम इंडियाचे 7 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. बांगलादेशकडून राबिया खानने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर सुलताना खातूनने 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय नाहिदा अख्तर, फहिमा खातून आणि शोरना अख्तर यांनी एकेक बळी मिळवला.
बांगलादेशचा सहज विजय
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने विजयासाठीचे लक्ष्य 18.2 षटकांत 6 गडी गमावत पूर्ण करत मालिकेतील पहिलावाहिला विजय मिळवला. बांगलादेशकडून शमिमा सुलतानने सर्वाधिक 46 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. तिने आपल्या खेळीत 3 चौकार मारले. कर्णधार सुलतानाने 14, सुलताना खातूनने 12 तर शातू रानीने 10 धावा केल्या. पण लक्ष्य मोठे नसल्याने यजमानांना मालिकेतील पहिला विजय मिळाला.









