वृत्तसंस्था/ बिश्केक
भारतीय महिला फुटबॉल संघाने गट ‘जी’मधून एएफसी महिला ऑलिम्पिक पात्रता फेरी-1 च्या दोन फेरींच्या लढतीतील पहिल्या सामन्यात किर्गिझ प्रजासत्ताकचा 5-0 असा पराभव करून या वर्षातील आपली विजयाविना चाललेली वाटचाल अखेर खडित केली.
कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या पाच आंतरराष्ट्रीय लढतींपैकी एकही जिंकण्यात अयशस्वी झाल्यानंतर, थॉमस डेनरबी यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय खेळाडूंनी शैलीत ही वाटचाल खंडित केली. या विजयामुळे भारताची पुढील फेरीत जाण्याची शक्यता बळकट झाली आहे. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येतील तेव्हा भारतीय संघाला या निकालाचा मोठा फायदा होईल.
पहिल्या सत्रात सौम्या गुगुलोथची क्लिनिकल व्हॉली, अंजू तमांगने केलेले दोन गोल आणि दुसऱ्या सत्रात शिकली देवी व रेणूचे आणखी दोन गोल जोरदार विजय मिळवण्यास पुरेसे ठरले. भारतीयांनी चांगली सुऊवात केली आणि वेळ न घालवता 6 व्या मिनिटाला अंजूने नोंदविलेल्या गोलाद्वारे सामन्यावर मिळविली. यजमानांचा खेळ स्थिरावण्याआधी अंजूने पुन्हा गोल करून भारताला प्रतिस्पर्ध्यांवर दोन गोलांची आघाडी मिळवून दिली.
चार मिनिटांनंतर सौम्याने जाळ्याच्या वरच्या कोपऱ्यात जबरदस्त व्हॉली मारत मध्यंतराच्या वेळी भारताची आघाडी 3-0 राहील याची तजवीज केली. त्यानंतर 61 व्या मिनिटाला शिल्कीने चौथा गोल केला. 62 व्या मिनिटाला रेणूने संध्याची जागा घेतली आणि त्यानंतर एका मिनिटात तिने डालिमाच्या फ्री-किकवर पाचवा गोल केला.









