वृत्तसंस्था/ लंडन
प्रतिष्ठित मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) जगातील काही उत्कृष्ट क्रिकेटपटूंना क्लबचे मानद् आजीवन सदस्यत्व प्रदान केलेले असून यात दिग्गज भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग, सुरेश रैना, मिताली राज आणि झुलन गोस्वामी या माजी खेळाडूंचा त्यात समावेश आहे. त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कारकिर्दीची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या यादीमध्ये कसोटी खेळणाऱ्या 12 पैकी 8 देशांचे खेळाडू आहेत. त्यापैकी इयान मॉर्गनने 2019 मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर दोन वर्षांनी जेनी गन, लॉरा मार्श आणि अन्या श्रबसोल यांनी त्याच ठिकाणी महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडला भारताचा पराभव करण्यास मदत केली होती. या साऱ्यांबरोबर चार वेळा अॅशेस जिंकण्याकामी मदत करणाऱ्या आणि 2010 च्या विश्वचषक स्पर्धेतील स्पर्धावीर राहिलेल्या केविन पीटरसनचा यात समावेश आहे.
पाच भारतीय खेळाडूंना मानद् आजीवन सदस्यत्व देण्यात आले आहे. त्यापैकी झुलन गोस्वामी ही महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील बळी घेण्याच्या बाबतीत आघाडीची गोलंदाज आहे, तर मिताली राज 211 डावांमध्ये 7 805 धावा करून फलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहे. धोनी आणि युवराज सिंग हे टी20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अविभाज्य भाग होते, तर सुरेश रैनाने 13 वर्षांच्या कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5500 हून अधिक धावा केलेल्या आहेत.









