वृत्तसंस्था/ थिम्पू, भुतान
येथे सुरू झालेल्या महिलांच्या यू-17 सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी विजयी प्रारंभ करताना नेपाळचा 7-0 असा धुव्वा उडविला. भारताच्या तिघींनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले. निरा चानू (25 व 56 वे मिनिट), अभिष्टा बासनेत (16, 41 वे मिनिट), अनुष्का कुमारी (37 व 62 वे मिनिटे) यांनी प्रत्येकी दोन तर कर्णधार जुलन नाँगमयथेमने पूर्वार्धातील जादा वेळेत भारतातर्फे एक गोल नोंदवला. मध्यांतराला भारताने 5-0 अशी भक्कम आघाडी घेत विजय निश्चित केला होता. नेपाळला त्यांनी पुनरागमनाची अजिबात संधी न देता एकतर्फी विजय मिळविला.
यावर्षी ही स्पर्धा दुहेरी राऊंडरॉबिन पद्धतीने खेळविली जात असून भारताला चांगली सुरुवात करणे आवश्यक होते आणि त्यांनी ती शानदार पद्धतीने केली. या सामन्यात प्रारंभापासूनच भारताने वर्चस्व राखले. सराव शिबिरात केलेल्या तयारीचे प्रतिबिंब त्यांच्या खेळात दिसून येत होते. मध्यफळी, आघाडी फळीने दर्जेदार प्रदर्शन केले तर बचावफळीची सुरुवातील परीक्षा झाली तरी त्यांनी भक्कम बचाव केला. गोलरक्षक मुनीने आत्मविश्वासपूर्वक गोलरक्षणाची जबाबदारी पार पाडत एकही गोल प्रतिस्पर्ध्याला करू दिला नाही. पेनल्टी कॉर्नर हे भारतासाठी मुख्य अस्त्र ठरले. 16 व्या मिनिटाला भारताला पहिले यश मिळाले. नेपाळची गोलरक्षक दुमराकोटीने दबावाखाली केलेल्या चुकीचा लाभ घेत बासनेत अगदी जवळून हा गोल नोंदवला. 25 व्या मिनिटाला अनुष्का कुमारीने ही आघाडी 2-0 अशी केली. नंतर 37 व्या मिनिटाला तिनेच संघाचा तिसरा व वैयक्तिक दुसरा गोल केला.
चार मिनिटानंतर बासनेतने कुमारीच्या पासवर वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत ही आघाडी 4-0 अशी केली. मध्यंतराच्या ठोक्याला भारताने पाचवा गोल नेंदवला. गोलपोस्टजवळ झालेल्या गोंधळात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जुलनने हा गोल केला. सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. तरीही उत्तरार्धात 56 व 62 व्या मिनिटाला भारताने आणखी दोन गोलांची भर घालत एकतर्फी विजय निश्चित केला.









