वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सांघिक जेतेपद मिळविणाऱ्या भारतीय महिला कुस्ती संघातील मल्लांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास अभिनंदन केले आहे. भारतीय महिला मल्लांनी या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करून जागतिक क्रीडाक्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल केले असून याचा देशाला प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर भारतीय महिला मल्लांच्या कामगिरीचे कौतुक करून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय महिला मल्लांनी या स्पर्धेत एकूण सात पदकांची कमाई केली असून त्यात तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारतीय महिला मल्ल अंतिम पांगलने या जागतिक स्पर्धेत दुसऱ्यांदा वैयक्तिक चॅम्पियनशीप राखली असून असा पराक्रम करणारी ही पहिली महिला मल्ल आहे. 53 किलो वजनगटात अंतिम पांगलने पाठोपाठ दोन वेळेला विश्व चॅम्पियनचा किताब मिळविला आहे. 62 किलो गटात भारताच्या सविताने दर्जेदार कामगिरी करत विश्व चॅम्पियनचा किताब मिळविला तसेच तिने भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या स्पर्धेमध्ये भारताच्या सात महिला मल्लांनी पदके मिळविली असून त्यामध्ये तीन सुवर्णपदके आहेत. अंतिम कुंडूने 65 किलो गटात रौप्यपदक तर रिनाने 57 किलो गटात, अर्जुने 68 किलो गटात, हर्षिताने 72 किलो गटात प्रत्येकी एक कास्यपदक मिळविले.









