विश्व चषक कबड्डी स्पर्धा: पुरुष विभागात स्कॉटलंड-भारत लढत बरोबरीत
वृत्तसंस्था / वूलव्हेरहॅम्पटन
2025 च्या पुरुष आणि महिलांच्या विश्व चषक कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यात महिलांच्या विभागात भारताने वेल्सचा एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली. मात्र पुरुषांच्या गटात स्कॉटलंडने भारताला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला.
महिलांच्या विभागातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताच्या अनुभवी महिला कबड्डीपटूंनी दर्जेदार कामगिरीचे दर्शन घडवित वेल्सचा 89-18 अशा गुणांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघातील चढाईपटूंनी आपल्या अचूक चढायांवर वेल्सचे दोनवेळा सर्वगडी बाद केले. महिलांच्या विभागातील अन्य एका सामन्यात इंग्लंडने हंगेरीचा 85-15 अशा गुणांनी पराभव केला. इंग्लंडच्या महिला कबड्डीपटूंनी सामन्यातील पहिल्या सत्रात हंगेरीचे सलग गडी बाद करत गुणांची वसुली सुरू केली. मात्र हंगेरीला शेवटपर्यंत इंग्लंडच्या आक्रमक खेळाला प्रत्युत्तर देता आले नाही. अखेर इंग्लंडच्या महिला संघाने हा सामना 70 गुणांच्या फरकाने जिंकला.
पुरुषांच्या विभागातील झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने भारताला 64-64 असे बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. भारतीय पुरुष कब•ाr संघाचा हा दुसरा सामना होता. भारतीय पुरुष संघाने या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात इटलीचा पराभव करत विजयी सलामी दिली होती. या सामन्यात पहिल्या सत्रामध्ये भारताचे सर्वगडी बाद करण्यामध्ये स्कॉटलंडच्या संघाला संधी मिळाली. पण त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या सत्रात भारतीय कबड्डीपटूंनी स्कॉटलंडच्या खेळाडूंना गुण मिळविण्यापासून रोखल्याने हा सामना अखेर बरोबरीत राहिला. भारतीय पुरुष आणि महिला संघ या या स्पर्धेतील विद्यमान विजेते आहेत. पुरुषांच्या विभागातील अन्य एका सामन्यात वेल्सने इटलीचा 71-32 अशा गुणांनी पराभव केला. इटलीचा या स्पर्धेतील पहिला विजय असून पहिल्या सामन्यात इटलीला भारताकडून हार पत्करावी लागली होती. पुरुषांच्या विभागातील अन्य एका सामन्यात पोलंडने हंगेरीचा 87-27 अशा 50 गुणांच्या फरकाने पराभव केला. वेल्सने हाँगकाँगचा 68-49 असा पराभव केला. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनचे ख्रिस जेनकीन्स यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
सामन्यांचे निकाल -पुरुष वेल्स वि.वि. इटली 71-32, पोलंड वि.वि. हंगेरी 87-27, वेल्स वि.वि. हाँगकाँग 68-49, भारत विरुद्ध स्कॉटलंड 64-64 बरोबरीत. महिला- भारत वि.वि. वेल्स 89-18, इंग्लंड वि. वि. हंगेरी 85-15.









