वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया
येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सलग तिसरा विजय नोंदवून उपांत्यफेरीतील स्थान निश्चित केले आहे. आता भारत आणि आयर्लंड यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होणार आहे. या स्पर्धेत बुधवारच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ब गटात झालेल्या बुधवारच्या सामन्यात भारतातर्फे दीपग्रेस एक्काने 14 व्या मिनिटाला तर गुरुजित कौरने 59 व्या मिनिटाला गोल नोंदविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. भारताने ब गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये भारत आता ब गटातून 9 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. हॉकी फेडरेशनच्या मानांकनात 8 व्या स्थानावरील भारताने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात चिलीचा 3-1 तर त्यानंतर दुसऱया सामन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या जपानचा 2-1 असा पराभव केला होता. अ गटात यजमान स्पेनने आघाडीचे स्थान मिळविताना दोन सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत राखला आहे. व्हॅलेन्सियामधील या स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश आहे. 2023-24 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी व्हॅलेन्सियातील सुरू असलेल्या नेशन्स चषक स्पर्धेतील विजेत्या संघाला बढती मिळणार आहे.









