वृत्तसंस्था / अँटवर्प
सध्या भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ युरोपच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात विविध संघांबरोबर त्यांचे सामने चालू आहेत. या दौऱ्यामध्ये भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने बेल्जियमवर सलग तिसरा विजय मिळविला.
तिसऱ्या सामन्यात भारताने बेल्जियमचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या लढतीत चौथ्याच मिनिटाला भारताचे खाते सोनमने उघडले. त्यानंतर भारतातर्फे लालथेनलुयांगीने 32 व्या मिनिटाला, कनिका सिवाचने 51 व्या मिनिटाला गोल केले. बेल्जियमतर्फे मारी गोएन्सने 37 व्या मिनिटाला तर मार्टी मेरीने 40 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात पहिल्या सत्रात भारताने आपले वर्चस्व राखले होते. 15 मिनिटांच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताला गोल नोंदविता आला नाही. मात्र तिसऱ्या सत्रात लालथेनलुयांगीने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा दुसरा गोल केला. बेल्जियमतर्फे मारी गोएन्सने पेनल्टी स्ट्रोकवर आपल्या संघाचे खाते उघडले. यानंतर 3 मिनिटांच्या कालावधीत बेल्जियमचा दुसरा गोल मारीने केला. सामना संपण्यास 9 मिनिटे बाकी असताना कनिकाने पेनल्टी कॉर्नरवर तिसरा आणि निर्णायक गोल करुन बेल्जियमचे आव्हान संपुष्टात आणले. आता भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचा पुढील सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे.









