वृत्तसंस्था/ रांची
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचे सहभागी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. ऑलिम्पिक पात्र फेरीच्या महिलांच्या हॉकी स्पर्धेत शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला जपानकडून हार पत्करावी लागली. या पराभवामुळे भारत आता पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. 2021 साली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने आपला सहभाग दर्शवून चौथे स्थान मिळवले होते.
भारत आणि जपान यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत जपानने आपला एकमेव निर्णायक गोल नोंदवला. जपानच्या केना युरेटाने पेनल्टी कॉर्नरवर मिळालेली संधी वाया दवडली नाही. या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात बलाढ्या जर्मनीने भारताचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केल्याने भारताला शुक्रवारच्या जपानविरुद्धच्या सामन्यात ऑलिम्पिक पात्रतेसाठी विजय मिळविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
न्यूझीलंड पाचव्या स्थानी
या स्पर्धेतील शुक्रवारी तळाच्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने इटलीचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत पाचवे स्थान पटकावले. न्यूझीलंडने या सामन्यात सातव्या मिनिटाला आपले खाते रोझ टिनेनच्या गोलवर उघडले. कर्णधार ऑलिव्हिया मेरीने 10 व्या मिनिटाला तर हेना कॉटेरने 31 व्या मिनिटाला गोल करून इटलीचे आव्हान संपुष्टात आणले. इटलीतर्फे एकमेव गोल 21 व्या मिनिटाला इव्हाना पेसिनाने पेनल्टी कॉर्नरवर केला. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन तर तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत एक गोल केला.
चिली सातव्या स्थानी
शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या अन्य एका सामन्यात चिलीने झेक प्रजासत्ताकचा 1-0 असा पराभव करत सातवे स्थान मिळविले. या सामन्यातील एकमेव विजयी निर्णायक गोल चिलीच्या पेनल्टी व्हिलीग्रेनने पेनल्टी स्ट्रोकवर केला. झेक प्रजासत्ताकने या सामन्यात पेनल्टी कॉर्नरवरच्या अनेक संधी वाया घालवल्या. महिला हॉकीच्या इतिहासामध्ये चिलीचा हा झेक प्रजासत्ताकवरील दुसरा विजय आहे. या स्पर्धेत चिलीने प्राथमिक फेरीतील लढतीत झेक प्रजासत्ताकचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला होता.









