वृत्तसंस्था / रोसारियो (अर्जेंटिना)
येथे सुरू असलेल्या चार राष्ट्रांच्या ज्युनियर महिला हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी केल्यानंतर गोलरक्षक व कर्णधार निधीने सलग चार बचाव केल्याने भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये यजमान अर्जेंटिनाचा 2-0 असा पराभव केला.
प्रारंभी कनिकाने 44 व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल केला तर लालरिनपुई आणि लालथंतलआंगीने शूटआऊटमध्ये गोल करुन भारताचा तिसरा विजय निश्चित केला. अर्जेंटिनाने दमदार सुरूवात केली. मिलाग्रोस डेलव्हेलने 10 व्या मिनिटाला पहिल्या सत्रात यजमान संघाला आघाडी मिळवून दिली आणि तिसऱ्या सत्रात कनिकाच्या गोलद्वारे भारताने प्रत्युत्तर दिले. आणखी गोल नोंदवता न आल्याने सामना बरोबरीत राहिला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. शुक्रवारी भारताचा पुढील सामना चिलीशी होईल.









