वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया (स्पेन)
येथे सुरू असलेल्या पाच देशांच्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात भारतीय संघातर्फे दीपिकाने चौथ्या मिनिटाला तर संगीता कुमारीने 22 व्या मिनिटाला गोल केले. आयर्लंडतर्फे एकमेव गोल कर्णधार कॅथ्रीन मुलेनने केला. भारतीय संघाने या सामन्यात सुरुवातीच्या 10 मिनिटात आक्रमक आणि वेगवान खेळावर भर दिला होता. चौथ्याच मिनिटाला दीपिकाने मैदानी गोल करून भारताचे खाते उघडले. मात्र भारताला ही आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. 12 व्या मिनिटाला कर्णधार कॅथ्रीन मुलेनने मैदानी गोल नोंदवून आयर्लंडला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला होता. सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीला प्रारंभ झाल्यानंतर भारताच्या संगीताकुमारीने गोल नोंदवून भारताला आघाडीवर नेले. मध्यंतरावेळी भारताने आयर्लंडवर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल नोंदवला गेला नाही. आयर्लंडने या सामन्यात किमान तीन पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. तर भारतालाही संपूर्ण सामन्यात किमान चार कॉर्नरचा फायदा घेता आला नाही.









