वृत्तसंस्था/ सँटीयागो (चिली)
विश्व हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिला विश्व चषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या 9 ते 12 स्थानासाठीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. या विजयामुळे भारताला आता नववे स्थान मिळण्याची शक्यता आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा शेवटचा सामना चिली किंवा अमेरिका बरोबर होणार आहे.
गुरुवारच्या सामन्यात भारतातर्फे रोपनी कुमारीने पेनल्टी कॉर्नरवर 23 व्या मिनिटाला, मुमताज खानने 44 व्या मिनिटाला तर अनुने 46 व्या मिनिटाला गोल नोंदविले. दक्षिण कोरियातर्फे एकमेव गोल 19 व्या मिनिटाला जियुन चोईने नोंदविला. भारतीय महिला संघाचे पदकासाठीचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले होते. क गटातून भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. गुरुवारच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दक्षिण कोरियाच्या बचाव फळीवर चांगलेच दडपण आणले होते. दरम्यान पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केल्याने गोलकोंडी फुटली नव्हती. 19 व्या मिनिटाला दक्षिण कोरियाचे खाते चोईने उघडले. कोरियाला ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. 23 व्या मिनिटाला रोपनी कुमारीने भारताला बरोबरी साधून देताना मैदानी गोल केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. तिसऱ्या सत्रात मुमताज खानने भारताचा दुसरा गोल करून दक्षिण कोरियावर आघाडी मिळविली होती. 46 व्या मिनिटाला अनुने भारताचा तिसरा गोल नोंदवून कोरियाचे आव्हान संपुष्टात आणले.









