वृत्तसंस्था / अॅडलेड
भारतीय महिला हॉकी संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघात यापूर्वी हॉकी कसोटी मालिका खेळवली गेली. त्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाचे सामने ऑस्ट्रेलिय अ संघाबरोबर खेळवण्यात आले. शनिवार येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया अ संघावर 2-1 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळवला.
भारतीय महिला हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया अ संघाबरोबर झालेल्या पहिल्या सामन्यात 2-3 अशा गोलफरकाने हार पत्करावी लागली होती. शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात भारताचे खाते दहाव्या मिनिटाला नवनीत कौरने उघडले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाला विल्सनने बरोबरी साधून दिली. ऑस्ट्रेलियाचा अ संघाचा हा पहिला गोल 22 व्या मिनिटाला नोंदवला गेला. 25 व्या मिनिटाला दीप ग्रेस एक्काने दुसरा आणि निर्णायक गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने ऑस्ट्रेलिया अ वर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. या सामन्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघाकडून गोल होऊ शकला नाही. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचा लाभ घेता आला नाही.









