प्रतिनिधी/ रांची
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यापासून फक्त एक विजय दूर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला आज गुरु`वारी येथे होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या बलाढ्या जर्मनीचा सामना करावा लागणार आहे. यावेळी अव्वल दर्जाचा खेळ त्यांना करावा लागेल.
भारतीय संघाला त्यांच्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध 0-1 असा पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर त्यांनी उसळी घेऊन न्यूझीलंड आणि इटलीला पराभूत करून ‘ब’ गटातून दुसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मागील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या सर्व विभागांनी एकसंधपणे कामगिरी केलेली असून सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील संघ स्पर्धेच्या शेवटीही अशीच कामगिरी घडविण्याचा प्रयत्न करेल.
येथील अव्वल तीन संघ यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील आणि गुऊवारी विजय मिळविल्यास भारतीय संघाचे पॅरिसचे तिकीट निश्चित होईल. जर भारतीय महिला तसे करण्यात अयशस्वी ठरल्या, तर शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात पराभूत झालेल्या संघाशी त्यांची गांठ पडेल. तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी सदर सामन्यातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची आणखी एक संधी त्यांना मिळेल.
पण भारताने जर्मनीविऊद्धच्या सामन्याकडे सकारात्मक विचार करून पाहण्याची गरज आहे. गेल्या दोन सामन्यांतील भारताच्या कामगिरीचा सर्वोत्तम पैलू म्हणजे त्यांची बचावफळी राहिलेली आहे. भारतीय बचावपटूंनी प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केलेला आहे. कर्णधार सविताच्या नेतृत्वाखालील आणि उदिता, मोनिका आणि निक्की प्रधान यांचा समावेश असलेल्या बचावफळीने मागील दोन सामन्यांमध्ये एकही चाल चुकीची केलेली नाही.









