वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला वरिष्ठ हॉकी संघ यंदा जुलैमध्ये जर्मनीतील निमंत्रितांची स्पर्धा खेळण्यासाठी फ्रँकफर्टला जाणार आहे. सदर आठवडाभराच्या दौऱ्यात भारतीय महिला संघ प्रथम रसेलशेम, फ्रँकफर्ट येथे सराव करेल आणि त्यानंतर जर्मन व चिनी संघांविऊद्ध सामन्यांची मालिका खेळेल. जर्मनीच्या या दौऱ्यानंतर संघ भारतात परतण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि स्पेन यांचा समावेश असलेली चार राष्ट्रांची स्पर्धा खेळण्यासाठी तेरासा, स्पेन येथे जाईल.
पॅरिस ऑलिम्पिकसाठीची पात्रता स्पर्धा असलेल्या आगामी आशियाई खेळांच्या तयारीसाठी भारतीय संघाला मदत करण्याच्या दृष्टीने हा जर्मन दौरा आखण्यात आला आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा महासंघ योजना साहाय्याच्या अंतर्गत या दौऱ्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यातून संघ आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांचा हवाई प्रवास खर्च, व्हिसा शुल्क, निवास खर्च, भोजन खर्च, स्थानिक वाहतूक खर्च आणि संघाचे इतर खर्च भागविण्यात येतील. जर्मनीचा दौरा 12 ते 19 जुलै या कालावधीत होणार आहे.
दरम्यान, हॉकी इंडियाने वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी 33 सदस्यांचा संभाव्य गट जाहीर केला आहे. हे शिबिर 11 जूनपासून भारतीय क्रीडा प्राधिकरण, बेंगळूर येथे सुरू झाले असून ते 11 जुलैपर्यंत चालणार आहे. हे शिबिर चीनमधील हँगझाऊ येथे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार असलेल्या आशियाई खेळांसाठीच्या संघाच्या तयारीचा एक भाग आहे, असे हॉकी संघटनेने कळविले आहे. निवडलेले खेळाडू पुढीलप्रमाणे : गोलरक्षक: सविता, रजनी एतिमारपू, बिचूदेवी खरिबम, बन्सारी सोळंकी, बचावपटू : दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, अक्षता आबासो ढेकळे, ज्योती छत्री, महिमा चौधरी, मध्य फळीतील खेळाडू : निशा, सलिमा टेटे, सुशीला चानू पुखरमबम, ज्योती, नवज्योत कौर, मोनिका, मारियाना कुजूर, सोनिका, नेहा, बलजित कौर, रिना खोखर, वैष्णवी फाळके, अजमिना कुजूर, आघाडीपटू : लालरेमसियामी, नवनीत कौर, वंदना कटारिया, शर्मिला देवी, दीपिका, संगीता कुमारी, मुमताज खान व सुनीलिता टोप्पो.









