वृत्तसंस्था / अॅन्टवेर्प (बेल्जियम)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील युरोपियन टप्प्यात येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान बेल्जियमने भारतीय महिला हॉकी संघाचा 2-0 असा पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघाचा युरोपियन टप्प्यातील हा सलग सहावा पराभव आहे.
या शेवटच्या सामन्यात बेल्जियमतर्फे अॅब्रे बॅलेनगेनने 40 व्या मिनिटाला तर हिलवर्टने 43 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. या सामन्यात भारताला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या सामन्यातील विजयामुळे यजमान बेल्जियमने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले असून नेदरलँड्स पहिल्या तर अर्जेंटिना दुसऱ्या स्थानावर आहे. बेल्जियममध्ये शनिवारच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला यजमान संघाकडून 1-5 असा दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने रविवारच्या सामन्यात किमान 5 पेनल्टी कॉर्नर वाया घालविले. आता भारतीय महिला हॉकी संघाचे या स्पर्धेतील पुढील दोन सामने चीनबरोबर पुढील आठवड्यात खेळविले जाणार आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात बेल्जियमचा महिला हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर आहे.









