3-2 गोलफरकाने चीन विजयी, नवनीत कौरचे 2 गोल वाया
वृत्तसंस्था/ लिम्बर्ग, जर्मनी
जर्मनी दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला रोमांचक ठरलेल्या पहिल्याच सामन्यात चीनकडून 2-3 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.
भारताचे गोल नवनीत कौर 24 व 45 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदवले तर चेन जियाली (9 वे मिनिट), झाँग जियाकी (45), झु यानन (51) यांनी चीनचे गोल नोंदवले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. भारतानेच सर्वप्रथम आक्रमक खेळ करीत पहिला पेनल्टी कॉर्नर तिसऱ्या मिनिटाला मिळविला. पण चायनीज बचावफळीने त्यावर भक्कम बचाव केल्याने भारताला त्याचा लाभ झाला नाही. काही मिनिटांनंतर बचाव करताना भारताकडून नियमभंग झाल्यानंतर चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्यावर नवव्या मिनिटाला चीनने पहिला गोल नोंदवून भारतावर आघाडी घेतली.
भारताने दुसऱ्या सत्रात सकारात्मक सुरुवात केली आणि योजनाबद्ध आक्रमण करीत लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्यावरही त्यांना गोल नोंदवता आला नाही. 24 व्या मिनिटाला केलेल्या जोरदार आक्रमक चढाईत नवनीत कौरने मैदानी गोल नोंदवत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. 45 व्या मिनिटाला भारताला आणखी एक संधी मिळाली आणि फॉर्ममध्ये असलेल्या नवनीत कौरने वैयक्तिक व भारताचा दुसरा गोल नोंदवून चीनवर 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
मात्र ही आघाडी फारवेळ टिकली नाही. चीनने लगेचच पेनल्टी कॉर्नरवर बरोबरी साधली. झाँगने हा गोल नोंदवला. 51 व्या मिनिटाला झु हिने तिसरा गोल नोंदवून भारतावर 3-2 अशी आघाडी घेतली. भारताने अखेरपर्यंत बरोबरीसाठी प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही आणि त्यांना चीनकडून अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. आज मंगळवारी व गुरुवारी भारताचे पुढील सामने जर्मनीविरुद्ध होणार आहेत.









