वृत्तसंस्था/ मस्कत
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी फाईव्ह्ज महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात नेदरलँड्सने भारताचा 7-2 असा दणदणीत पराभव करुन अजिंक्यपद पटकाविले.
अंतिम सामन्यात नेदरलँड्सतर्फे जेनेकी व्हॅन डी व्हेनीने 2 ऱ्या आणि 14 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. बेनेटी व्हॅन डेर विलेटने 4 थ्या आणि 8 व्या मिनिटाला असे 2 गोल नोंदविले. लेना कॅलेसीने 11 व्या आणि 27 व्या मिनिटाला 2 गोल नोंदविले. सोशा बेनिंगाने 13 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. या सामन्यात नेदरलँड्सच्या 3 खेळाडूंनी प्रत्येकी 2 गोल नोंदविले. भारतातर्फे ज्योती छेत्रीने 20 व्या तर ऋतुजा पिसाळने 23 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात उभय संघाचे सर्व गोल पूर्वार्धात नोंदविले गेले. मात्र उत्तरार्धात उभय संघाकडून एकही गोल नोंदविला गेला नाही. मध्यंतरावेळी नेदरलँड्सने भारतावर 7-2 अशी आघाडी मिळविली होती. या स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी दर्जेदार झाल्याने हॉकी इंडियाने उपविजेत्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपयांचे बक्षीस तर या संघाला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.









