आजपासून युरोपियन टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ, आरंभीच्या लढती ऑस्ट्रेलियाविरुद्ध
वृत्तसंस्था/ लंडन
अडचणी दूर करण्यासाठी खूप मेहनत घेतल्यानंतर भारतीय संघ आज शनिवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या सामन्यापासून महिला हॉकी प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यामध्ये दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य ठेवेल. सध्या नऊ गुणांसह सहाव्या क्रमांकावर असलेला भारत आज 14 आणि उद्या 15 जून रोजी ऑस्ट्रेलियाचा सामना करेल.
त्यानंतर भारतीय संघ 17 आणि 18 जून रोजी अर्जेंटिनाविऊद्ध सलग दोन सामने खेळेल, तर 19 जून रोजी अँटवर्पला जाऊन बेल्जियमविऊद्ध दोन सामने खेळेल, जे 21 आणि 22 जून रोजी होणार आहेत. त्यानंतर युरोपियन टप्पा 28 आणि 29 जून रोजी बर्लिनमध्ये होणाऱ्या चीनविऊद्धच्या सामन्यांसह संपेल. ‘आम्ही प्रत्येक विभागात मेहनत घेतलेली आहे. परंतु निकालाभिमुख असल्याने मी ज्या दोन विभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे ते गोलरक्षण आणि ड्रॅग फ्लिकिंग हे आहेत’, असे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांना सांगितले.
सिंग यांनी असेही सांगितले की, ड्रॅग फ्लिकर्स दीपिका आणि मनीषा यांनी दौऱ्यापूर्वी प्रसिद्ध डच ड्रॅग-फ्लिक तज्ञ टून सिपमन यांच्यासमवेतच्या 10 दिवसांच्या विशेष शिबिरात भाग घेतला. ‘दीपिका आणि मनीषा यांनी टून सिपमन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे, सिपमन यांना जगातील काही अव्वल खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा मोठा अनुभव आहे. आम्ही आमचे इंजेक्टर आणि स्टॉपर्स सुधारण्यावरही काम केले आहे. पूर्वी पाच खेळाडू त्या भूमिकांमध्ये राहायच्या, आता आम्ही ती संख्या तीनपर्यंत कमी केली आहे’, असे सिंग यांनी सांगितले.
फेब्रुवारीमध्ये प्रो लीगच्या भारतीय टप्प्यादरम्यान मिळालेल्या गतीत भर घालण्याचा भारत प्रयत्न करेल. तिथे त्यांनी भुवनेश्वरमध्ये जागतिक अव्वल क्रमांकधारक नेदरलँड्सशी 2-2 अशी बरोबरी साधली होती आणि शूटआउटद्वारे बोनस गुण मिळविला होता. गेल्या महिन्यात पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया ‘अ’ आणि हॉकीरूस यांच्याविऊद्ध झालेल्या पाच मैत्रिपूर्ण सामन्यांत संघाने नवीन रचनेचा प्रयोग केला होता. निकाल मिश्र राहिलेले असले, तरी सिंग म्हणाले की, या दौऱ्याने सलीमा टेटेच्या संघास मौल्यवान धडा दिला आहे. ऑस्ट्रेलियाने पूर्ण दबाब टाकला आणि त्यांना प्रतिहल्ला करून कसे ताणायचे हे आम्हाला शिकायला मिळाले. आम्हाला हे देखील शिकायला मिळाले की, आपण स्टिक-टू-स्टिक हॉकी खेळायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रशिक्षकांनी एका संतुलित संघाची निवड केली असून ज्यामध्ये अनुभव आणि तऊण प्रतिभेचे मिश्रण आहे. सिंग यांना सप्टेंबरच्या आशिया चॅम्पियनशिपदरम्यान संघाने शिखर गाठावे अशी इच्छा आहे. कारण सदर स्पर्धा जिंकल्यास पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी त्यांनां आपोआप पात्रता मिळेल. गेल्या वर्षी प्रो लीग जिंकल्यामुळे जर्मनी, तर बेल्जियम आणि नेदरलँड्स सह-यजमान असल्याने विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. प्रो लीगमधील चांगली कामगिरी भारतासाठी विश्वचषकात स्थान निश्चित करू शकते.









