वृत्तसंस्था/ सँटीयागो (चिली)
विश्व हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या संपूर्ण स्पर्धेला शौकिनांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
भारत आणि अमेरिका यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे गोल बरोबरीत होते. सडन डेथमध्ये भारतीय संघातील गोलरक्षक किंडोने अमेरिकन खेळाडूचा फटका थोपविला. तर भारताच्या ऋतुजा पिसाळने सडन डेथमध्ये निर्णायक गोल केला.
या सामन्यात निर्धारित 60 मिनिटांच्या कालावधीत भारतातर्फे 2 गोल नोंदविले गेले. मंजू चौरासियाने 11 व्या मिनिटाला तर सुनेलिता टोप्पोने 57 व्या मिनिटाला गोल नोंदविले. अमेरिकन संघातर्फे कर्सटेन थॉमेसीने 27 व्या आणि 53 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. पेनल्टी शूटाऊटमध्ये मुमताज खान आणि ऋतुजा पिसाळ यांनी अचूक गोल नोंदविले. ऋतूजाने सडन डेथमध्ये निर्णायक गोल केला. पेनल्टी शूटाऊअमध्ये अमेरिकेतर्फे कॅटी डिक्सॉन आणि ऑलिव्हिया कोलेने गोल केले. या सामन्यामध्ये भारतीय संघाला अनेक पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण ते वाया गेल्याने भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकता आला नाही.









