वृत्तसंस्था / हांगझोयु (चीन)
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी सुपर-4 फेरीतील भारत आणि जपान यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.15 वाजता प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी सलीमा टेटेच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाला विजयाची नितांत गरज आहे.
या स्पर्धेत प्राथमिक गटातील झालेल्या सामन्यात जपानने भारताला 2-2 असे बरोबरीत रोखले होते. भारतीय महिला हॉकी संघाला गुरूवारी या स्पर्धेतील सुपर-4 फेरीतील सामन्यात चीनने 4-1 असे पराभूत केले होते. या स्पर्धेत चीनने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. हा अंतिम सामना रविवारी खेळविला जाईल. गुरूवारच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमविला नव्हता. मात्र चीन विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना तीन पेनल्टी कॉर्नर्सची संधी उठविता आली नाही. यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला होता.
जपानविरुद्धच्या शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नर्सचा योग्य उपयोग करुन घ्यावा लागेल. भारतीय संघाला या स्पर्धेतील अंतिम फेरी गाठण्यासाठी शनिवारचा सामना अनिर्णीत राखला तरी पुरेसा आहे. भारतीय संघातील आघाडी फळी खेळणारी मुमताज खान हीच्या कामगिरीवर लक्ष लागून आहे. तिने या स्पर्धेत अप्रतिम मैदानी गोल नोंदविले आहेत. आतापर्यंत तिने या स्पर्धेत सहा गोल नोंदवित दुसरे स्थान मिळविले असून चीनची झोयु 10 गोलांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताच्या नवनीत कौरने 5 गोल केले आहेत. ऋतुजा पिसाळ, लालरेमसियामी, उदिता, शर्मिला देवी आणि ब्युटी डुंगडूंग यांना दर्जेदार कामगिरी करावी लागेल. नेहा गोयल आणि वैष्णवी फाळके यांना मध्यफळीत चांगली कामगिरी करणे जरुरीचे आहे. जागतिक महिला हॉकी संघांच्या मानांकनात भारत सध्या नवव्या स्थानावर आहे. आशिया चषक स्पर्धा जिंकणारा संघ पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्र राहणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय महिला हॉकी संघाला या स्पर्धेत जेतेपदाची नामी संधी आहे. पण मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेणे हे त्यांच्यावर अवलंबून राहील.









