वृत्तसंस्था /हाँगझोऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हॉकी या क्रीडा प्रकारात भारतीय महिला हॉकी संघाला संभाव्य सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे. या क्रीडा प्रकारातील गुरुवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान चीनने भारताचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. या पराभवामुळे आता पुढील वर्षीय होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाला थेट प्रवेश मिळणार नाही.
2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला गुरुवारच्या सामन्यात चीनने एकतर्फी पराभूत केले. या सामन्यात चीनतर्फे 25 व्या मिनिटाला जियाक्वी झोंगने पहिला गोल केला. 40 व्या मिनिटाला झोयूने चीनची आघाडी वाढविली. 55 व्या मिनिटाला मेयू लियांगने चीनचा तिसरा गोल केला. 60 व्या मिनिटाला बिंगफेंगग्यूने चीनचा चौथा आणि शेवटचा गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात सुरुवातीपासूनच चीनने आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत भारतीय बचाव फळीवर शेवटपर्यंत दडपण आणण्यात यश मिळविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत चीनने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 6 व्या मिनिटाला चीनला पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण भारतीय संघाची कर्णधार व गोलरक्षक सविता पुनियाने चीनचे हे हल्ले थोपविले. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांना खाते उघडता आले नाही. दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीतील 5 मिनिटे बाकी असताना चीनला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या झोंगने अचूक गोल केला. भारतीय संघाने बचावात्मक खेळावर अधिक भर दिल्याने चीनने अधिक आक्रमक खेळ केला. खेळाच्या उत्तरार्धातील 10 व्या मिनिटाला चीनला पुन्हा सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. झोयूने चीनचा दुसरा गोल 40 व्या मिनिटाला केला. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत चीनने आणखी दोन गोल करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारताला 3 पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते वाया गेले. आता जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातील पराभूत झालेल्या संघाबरोबर भारताची कास्यंपदकासाठी लढत शनिवारी होईल.









