वृत्तसंस्था/लंडन
2024-25 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारतीय महिला हॉकी संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-0 असा पराभव केला. या लढतीत निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. भारतीय महिला हॉकी संघाने या सामन्यात बोनस गुण गमविला. या सामन्यामध्ये मध्यंतरापर्यंत अर्जेंटिनाने भारतावर 1-0 अशी निसटती आघाडी घेतली होती. 27 व्या मिनिटाला ऑगेस्टीना गोर्झेलेनीने पेनल्टी कॉर्नरवर शानदार गोल केला. अर्जेंटिनाला मिळालेला हा पहिला कॉर्नर होता. खेळाच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत अर्जेंटिनाचा दुसरा गोल ऑगेस्टीना गोर्झेलेनीने केला. ऑगेस्टीनाने या सामन्यात निर्धारित वेळेतील दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. भारतातर्फे 50 व्या मिनिटाला नवनीतने तर 60 व्या मिनिटाला दिपीकाने गोल नोंदविल्याने हा सामना निर्धारित वेळेत भारताने बरोबरीत राखला होता. सामन्याच्या पूर्वाधार्थ भारताने दोनवेळा अर्जेंटिनाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली होती.
पण अर्जेटिनाच्या भक्कम बचाव फळीमुळे भारताला आपले खाते उघडता आले नाही. 25 व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण दिपीकाचा हा फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेला. भारतीय संघातील वैश्णवी फाळकेचा खेळ आक्रमक आणि वेगवान झाल्याने अर्जेंटिनाच्या बचाव फळीवर थोडे दडपण आल्याचे समजले. 35 व्या मिनिटाला भारताला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि मनीषाचा हा फटका अर्जेटिनाच्या गोलरक्षकाने थोपविल्याने भारतीय संघावर अधिकच दडपण आले. या सामन्यातील शेटवच्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्या डावपेचात बदल केल्याने अर्जेंटिनावर थोडे दडपण आले होते. 50 व्या मिनिटाला नवनीत कौरने अर्जेंटिनाच्या बचाव फळीतील दोन खेळाडूंना हुलकावणी देत मैदानी गोल केला. सामना संपण्यात केवळ काही सेकंद बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि दिपीकाने गोल नोंदविला. पेनल्टी शूटआऊटमध्ये बोनस गुणासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न चालु होते. पण भारताला गोल करता आला नाही. दरम्यान ब्रिसा ब्रुगेसर आणि सोफीया कैरो यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचे दोन गोल नोंदवित भारताचे आव्हान संपुष्टात आणले.









