वृत्तसंस्था/ लंडन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे 2 गोल मैदानी तर 1 गोल पेनल्टी स्ट्रोकवर नोंदविला गेला. भारतातर्फे दीपिका आणि नेहा यांनी पेनल्टी कॉर्नरवर प्रत्येकी 1 गोल केला.
या सामन्यात 9 व्या मिनिटाला भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाची बचावफळी भेदत गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण त्यांना आपले खाते उघडता आले नाही. 13 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक पॉवेरने भारताचे 2 हल्ले पाठोपाठ परतविले. 16 व्या मिनिटाला. ऑस्ट्रेलियाचे खाते कोर्टनी स्कोनेलने उघडले. 26 व्या मिनिटाला लेक्सी पिकेरींगने ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. उत्तरार्धाती खेळाला प्रारंभ झाल्यानंतर 5 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली आणि स्टिव्हर्टने कोणतीही चूक न करताना ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोल केला. या सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय आघाडी फळीने पाठोपाठ चढाया करत 2 पेनल्टी कॉर्नर मिळविले. दीपिका आणि नेहा यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सामना संपण्यास 8 मिनिटे बाकी असताना भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण ऑस्ट्रेलियन गोलरक्षकाने दीपिकाचा फटका अचूक थोपविला. सामन्यातील 2 मिनिटे बाकी असताना भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेल्याने भारताला हा सामना थोडक्यात गमवावा लागला.









