वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एफआयएच प्रो लीगच्या युरोपियन लीगमध्ये जोरदार कामगिरी करण्याच्या उद्देशाने भारतीय महिला हॉकी संघ बुधवारी सकाळी बेंगळूरहून अॅमस्टरडॅमला रवाना झाला.
भारतीय संघ 8 जूनपर्यंत अॅमस्टरडॅममध्ये सराव करेल आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनाविरुद्धच्या पहिले चार सामने खेळण्यासाठी लंडनला रवाना होईल. भारत 14 आणि 15 जून रोजी ऑस्ट्रेलियन महिला संघाशी सामना करेल, त्यानंतर 17 व 18 जून रोजी अर्जेटिनाविरुद्धचे सामने खेळेल. त्यानंतर भारत 21 व 22 जून रोजी बेल्जियमविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांसाठी 19 जून रोजी अँटवर्पला जाणार आहे. 28 व 29 जून रोजी बर्लिनमध्ये चीनविरुद्धच्या दोन सामन्यांसह युरोपियन लीगचा ते समारोप करतील.
एफआयएच हा लीग अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आम्हाला चार अतिशय बलाढ्या संघांचा सामना करावा लागणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक कसोटी सामना खेळला आहे आणि हॉकीरुस आणि इतर संघांविरुद्धच्या सामन्यांपूर्वी आम्ही अॅडस्टरडॅममध्ये आमची रणनिती आणखी चांगल्या प्रकारे आखू, असे भारताच्या कर्णधार सलिमा टेटे यांनी हॉकी इंडियाच्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उपकर्णधार नवनीत कौरने सलीमाच्या विचारांना दुजोरा दिला. भारत या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रो लीगच्या इंडिया लेगमध्ये त्यांच्या गतीवर भर देण्याचा प्रयत्न करेल. भारताने भुवनेश्वरमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली आणि बोनस पॉईंट मिळविला. या महिन्याच्या सुरुवातीला संघाने ऑस्ट्रेलिया अ आणि हॉकारूजविरुद्धचा मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये पर्थमध्ये नवीन कॉम्बिनेशन्सची चाचणी देखील घेतली.









