वृत्तसंस्था / बेंगळूर
चीनमध्ये होणाऱ्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी चीनकडे प्रयाण केले.पुढील वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाला चीनमधील आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकावीच लागेल.
आशिया चषक हॉकी स्पर्धा हाँगझोयु येथे खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी 20 सदस्यांचा भारतीय महिला हॉकी संघ निवडण्यात आला. चीनमधील या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. ब गटामध्ये भारत, जपान, थायलंड आणि सिंगापूर यांचा सहभाग राहील. भारतीय संघाला प्राथमिक फेरीमध्ये जपान, थायलंड आणि सिंगापूर संघाबरोबर सामने खेळावे लागतील. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना थायलंड बरोबर 5 सप्टेंबरला दुसरा सामना जपानबरोबर 6 सप्टेंबरला आणि तिसरा सामना सिंगापूर बरोबर 8 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धा यापूर्वी दोनवेळा जिंकली आहे. 2004 आणि 2017 साली भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.









