भारत-कोरिया महिला हॉकी लढतीतील एक क्षण
वृत्तसंस्था/ रांची
महिलांच्या अशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत यजमान भारताने दक्षिण कोरियाचा 2-0 अशा गोल फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता भारत आणि जपान यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेत राऊंड रॉबीन फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने कोरियाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला होता. त्यानंतर शनिवारी झालेल्या दक्षिण कोरिया विरूध्दच्या सामन्यात 11 व्या मिनिटाला भारताचे खाते सलिमा टेटेने उघडले. 19 व्या मिनिटाला वैष्णवी फाळकेने भारताचा दुसरा गोल नोंदविला. मध्यतंरापर्यंत भारताने दक्षिण कोरियावर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. अलिकडेच झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या महिला हॉकी संघाने रौप्य पदक मिळविले होते.
अशिया चॅम्पियन्स करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेत दुसऱ्या एका उपांत्य सामन्यात जपानने अशिया चॅम्पियन्स चीनचा 2-1 असा पडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात जपानतर्फे केना युरेटाने 34 व्या मिनिटाला तर मियु सुझूकीने 44 व्या मिनिटाला गोल केले. चीनतर्फे एकमेव गोल 11 व्या मिनिटाला मियु लुवोने केला. भारतीय संघाची कर्णधार सविता पुनिया आता या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.









