वृत्तसंस्था / अॅन्टवेर्प (बेल्जियम)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग महिलांच्या हॉकी स्पर्धेतील युरोपियन टप्प्यात शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान बेल्जियमने भारताचा 5-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात विजय मिळविलेल्या बेल्जियम संघाला 17 पेनल्टी कॉर्नर मिळाले. भारतीय महिला हॉकी संघाने यापूर्वी या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना बरोबर झालेले प्रत्येकी 2 सामने गमविले आहेत. त्यांचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा पराभव आहे.
शनिवारच्या सामन्यात सहाव्या मिनिटाला दिपीकाने भारताला खाते उघडून आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर बेल्जियमच्या आक्रमक खेळासमोर भारतीय संघातील खेळाडू निस्तेज ठरले. बेल्जियमतर्फे हेलन ब्रेसूरने 37 व्या आणि 55 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. बेल्जियमतर्फे लुसी ब्रीनेने 41 व्या मिनिटाला, अँब्रे बॅलेनगेनने 54 व्या मिनिटाला तर चार्लोटी इंग्लेबर्टने 58 व्या मिनिटाला गोल केले. बेल्जियमच्या इंग्लेबर्टने पेनल्टी स्ट्रोकवर आपल्या संघाचा शेवटचा गोल नोंदविला. भारतीय संघाला या सामन्यात पेनल्टी कॉर्नर्सची संधी मिळाली होती. पण त्याचा लाभ घेता आलेला नाही. आता या दौऱ्यातील भारतीय महिला हॉकी संघाचा बेल्जियमबरोबरचा दुसरा सामना रविवारी येथे खेळविला जाणार आहे.









