वृत्तसंस्था / भुवनेश्वर
2025 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग महिलांच्या हॉकी स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन्स नेदरलँड्सने भारतीय महिला हॉकी संघाचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला.
या सामन्यात भारतीय संघाला 13 पेनल्टी कॉनर्स मिळाले. पण त्याचा पुरेपूर लाभ घेता आला नाही. ऑलिम्पिक चॅम्पियन्स नेदरलँड्सला 3 पेनल्टी कॉनर्स मिळाले पण ते वाया गेले. या सामन्यात सातव्या मिनिटाला नेदरलँड्सचे खाते इमा रिझेनेनने उघडले. मात्र नेदरलँड्सला ही आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. उदिताने 18 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 34 व्या मिनिटाला फेलिसी अल्बेर्सने नेदरलँड्सचा दुसरा गोल केला. 40 व्या मिनिटाला फे व्हॅन डेअर इलेस्टने नेदरलँड्सचा तिसरा गोल नोंदविला. 42 व्या मिनिटाला उदिताने भारताचा दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर केला. या सामन्यात भारताचे दोन्ही गोल उदिताने नोंदविले. 47 व्या मिनिटाला अल्बेर्सने नेदरलँड्सचा चौथा गोल नोंदवून भारताचे आव्हान 4-2 असे संपुष्टात आणले. भारताची माजी कर्णधार आणि गोलरक्षक सविता पुनियाचा हा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. आता भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील परतीचा सामना मंगळवारी उशीरा खेळविला जात आहे.









