वृत्तसंस्था/ सँटियागो (चिली)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत जर्मनीच्या महिला हॉकी संघाने भारताचा 4-3 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीला दोन गोलांची आघाडी मिळवली होती.
या सामन्यामध्ये गेल्या खेपेचा या स्पर्धेतील उपविजेत्या जर्मनीने भारताविरुद्धच्या सामन्यात दर्जेदार खेळ केला. त्यांनी आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता. मात्र सामन्याच्या पूर्वार्धात भारतीय संघाने जर्मनीवर चांगले दडपण आणत दोन गोलांची आघाडी मिळवली होती. 11 व्या मिनिटाला अनूने भारताचे खाते उघडले. त्यानंतर रोपनी कुमारीने 14 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. भारताला ही आघाडी फार वेळ राखता आली नाही. 17 व्या मिनिटाला सोफिया स्विबेने जर्मनीचे खाते उघडले. 21 व्या मिनिटाला लॉरा फ्लथने जर्मनीला बरोबरी साधून दिली. 24 व्या मिनिटाला मुमताज खानने भारताचा तिसरा गोल केलो सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने जर्मनीवर 3-2 अशी आघाडी मिळवली होती.
सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर सहाव्याच मिनिटाला लॉरा फ्लथने संघाचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. जर्मनीने भारताची बरोबरी यावेळी साधली होती. यानंतर केवळ दोन मिनिटांच्या कालावधीत कॅरोलिन सिडेलने जर्मनीचा चौथा आणि शेवटचा गोल केला. भारतीय संघाला यानंतर शेवटपर्यंत जर्मनीशी बरोबरी साधता आली नाही. भारताने या सामन्यात शेवटच्या 15 मिनिटात सलग दोन पेनल्टी कॉनर्स गमवले. त्यामुळे भारताला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेतील भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचा तिसरा सामना शनिवारी बेल्जियमबरोबर होत आहे.









