वृत्तसंस्था/ अॅडलेड
भारताचा महिला हॉकी संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची हॉकी कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील शनिवारी झालेल्या दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाच्या महिला हॉकी संघाने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियातर्फे टेटूम स्टीवर्टने 12 आणि 45 व्या मिनिटाला असे दोन गोल तर पिपा मॉर्गनने 38 व्या मिनिटाला एक गोल नोंदवला. भारतातर्फे संगीताकुमारीने 13 व्या मिनिटाला तर गुरजित कौरने 17 व्या मिनिटाला गोल केले. या दुसऱ्या कसोटीत मध्यंतरापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. या सामन्यात भारतीय महिला संघाने अनेक पेनल्टी कॉर्नर्स वाया घालविले.
तीन सामन्यांच्या या कसोटी हॉकी मालिकेत महिला हॉकी सांघिक मानांकनात तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतावर 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील गेल्या गुरुवारी झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 4-2 असा दणदणीत पराभव केला होता. आता या मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी अॅडलेडमध्ये रविवारी खेळवली जाणार आहे.









