वृत्तसंस्था / कॅनबेरा
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाला शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाकडून हार पत्करावी लागली आहे.
या दौऱ्यातील झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 21 वर्षांखालील वयोगटाच्या महिला हॉकी संघाने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. ऑस्ट्रेलिया संघातर्फे बिनाका झुरेरने 36 व्या मिनिटाला, श्रेन्सबायने 45 व्या मिनिटाला तर सॅमी लव्हने 56 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात भारतातर्फे ललितानतुलंगीने 47 व्या मिनिटाला तर सोनमने 54 व्या मिनिटाला गोल केला. या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत गोलफरक कोराच होता. तसेच मध्यंतरापर्यंत उभय संघाकडून गोल होऊ शकला नाही. 36 व्या मिनिटाला बिनाका झुरेरने ऑस्ट्रेलियाचे खाते पेनल्टी कॉर्नरवर उघडले. 45 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि श्रेन्सबायने ऑस्ट्रेलियाची आघाडी 2-0 अशी वाढविली. शेवटच्या 15 मिनिटांच्या सत्रामध्ये भारताकडून दोन गोल नोंगविले गेले. 47 व्या मिनिटाला ललितानतुलंगीने पेनल्टी कॉर्नरवर भारताचे खाते उघडले तर 54 व्या मिनिटाला सोनमने मैदानी गोल करुन भारताचा दुसरा गोल नोंदवित ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधली. सामना संपण्यास केवळ एक मिनिट बाकी असताना ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि सॅमी लव्हने या संधीचा फायदा घेत आपल्या संघाला 3-2 अशा गोलफरकाने विजय मिळवून दिला.









