वृत्तसंस्था/ केपटाऊन
भारतीय महिला हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर असून या दौऱयात त्यांचे मित्रत्वाचे हॉकी सामने खेळविले जात आहेत. या दौऱयात भारतीय महिला संघाने चार सामन्यांच्या हॉकी कासोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला. त्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाचे सामने बलाढय़ नेदरलँड्स (हॉलंड) संघाबरोबर खेळविले जात आहेत. केपटाऊनमध्ये झालेल्या दुसऱया मित्रत्वाच्या सामन्यात नेदरलँड्सने भारताचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
भारतीय महिला हॉकी संघाचा टॉप सिडेड आणि बलाढय़ नेदरलँड्स विरुद्धचा हा दुसरा सलग पराभव आहे. या सामन्यात चौथ्या मिनिटाला नेदरलँड्सचे खाते मेरजीन व्हेनने उघडले. 13 व्या मिनिटाला वेलटनने नेदरलँड्सचा दुसरा गोल नोंदविला. 29 व्या मिनिटाला वेलटनने संघाचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल करुन भारतावर अधिकच दडपण आणले. मध्यंतरापर्यंत नेदरलँड्सने भारतावर 3-0 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. 50 व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल सलिमा टेटेने केला. आता भारताचा शेवटचा मित्रत्वाचा सामना नेदरलँड्स बरोबर शनिवारी उशिरा होत आहे.









