वृत्तसंस्था / व्हॅलेन्सिया (स्पेन)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीच्या समीप मजल मारली आहे.
या सामन्यात पाचव्या मिनिटाला भारताचे खाते सलिमा टेटेने उघडले. सलिमा टेटेने जपानच्या बचावफळीतील दोन खेळाडूंना हुलकावणी देत भारताचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर भारताचा दुसरा गोल झारखंडच्या नवोदित इका डुंगडुंगने केला. आंतरराष्ट्रीय वरिष्ठ स्पर्धेतील डुंगडुंगचा हा पहिलाच गोल आहे. मध्यंतरापर्यंत भारताने जपानवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. जपानतर्फे एकमेव गोल 49 व्या मिनिटाला ऊई तेकाशिमाने केला. भारताचा या स्पर्धेत ब गटात समावेश असून आतापर्यंत भारताने या स्पर्धेत ब गटातील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. सलामीच्या सामन्यात भारताने चिलीवर 3-1 अशी मात केली होती. सदर स्पर्धेमध्ये 8 संघांचा समावेश असून भारताने ब गटातील गुणतक्त्यात सहा गुणासह पहिले स्थान मिळवले आहे. आता या गटातील भारताचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर 14 डिसेंबरला होणार आहे. हा सामना भारताने बरोबरीत सोडविल्यास त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल. 2018 आशियाई स्पर्धेत जपानने भारताला हरवून सुवर्णपदक मिळवले होते.









