वृत्तसंस्था/ रांची
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत झालेल्या सामन्यात यजमान भारताने बलाढ्या चीनचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात भारतातर्फे दीपिकाने 15 व्या मिनिटाला तर सलिमा टेटेने 26 व्या मिनिटाला गोल नोंदविले. मध्यंतरापर्यंत भारताने चीनवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. चीनतर्फे एकमेव गोल खेळाच्या 41 व्या मिनिटाला झाँग जियाक्वीने केला. गेल्या महिन्यात हाँगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हॉकी या क्रीडा प्रकारात यजमान चीनने भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत पराभव केल्याने भारतीय महिला हॉकी संघाला पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेशापासून वंचित व्हावे लागले होते.
दरम्यान, सोमवारी झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आक्रमक आणि वेगवान खेळावर भर देत चीनला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात भारताला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर मोनिकाला गोल नोंदविता आला नाही. सामन्याच्या पूर्वार्धात दीपिका आणि सलिमा टेटे यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविल्याने चीनचा संघ मध्यंतरापर्यंत 2 गोलांनी पिछाडीवर होता. भारताच्या बचाव फळीची तसेच गोलरक्षकाची कामगिरी दर्जेदार झाल्याने चीनला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर्सवर गोल नोंदविता आले नाहीत. भारतीय संघाची कर्णधार आणि गोलरक्षक सविता हिला तिसऱ्या सत्रात चीनच्या झाँग जियाक्वीने हुलकावणी देत पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. या सामन्यातील चीनचा हा एकमेव गोल ठरला. भारतीय संघातील वंदना कटारीयाचा हा 299 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.









