वृत्तसंस्था/ बेंगळूर
रांची येथे 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या ऑलिंम्पिक पात्र फेरीच्या हॉकी स्पर्धेसाठी शनिवारी येथे हॉकी इंडियाने 18 सदस्यांचा भारतीय महिला हॉकी संघ जाहीर केला असून अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वंदना कटारिया संघाची उपकर्णधार म्हणून राहील.
2024 साली होणाऱ्या पॅरीस ऑलिंम्पिक स्पर्धेचे तिकिट मिळविण्याकरिता रांचीत पात्र फेरीची स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत पुनियाच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला हॉकी संघ पहिल्या तीन संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. रांचीतील ही स्पर्धा भारतीय हॉकी संघाच्या दृष्टीकोनातून ऑलिंम्पिक पात्रतेसाठी महत्त्वाची असल्याचे संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्कोपमन यांनी म्हटले आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय महिला हॉकी संघ निश्चितच समतोल असून अनुभवी आणि दर्जेदार नवोदित खेळाडूंचे मिश्रण पहावयास मिळेल. सविता पुनिया आणि वंदना कटारिया हे या संघातील अनुभवी हॉकीपटू म्हणून ओळखले जातात. सविताने अलिकडेच सलग तिसऱ्या वर्षी हॉकी फेडरेशनच्या सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळविला आहे. वंदना कटारियाने आतापर्यंत 300 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
रांचीमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. या गटामध्ये न्यूझीलंड आणि इटली तसेच अमेरिका यांचा सहभाग राहील. अ गटामध्ये जर्मनी, जपान, चिली आणि झेक प्रजासत्ताक हे चार संघ आहेत. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 13 जानेवारीला अमेरिका बरोबर, दुसरा सामना 14 जानेवारीला न्यूझीलंड बरोबर तर तिसरा सामना 16 जानेवारीला इटली बरोबर होणार आहे.
भारतीय संघ-गोलरक्षक-सविता पुनिया (कर्णधार), के. बिचूदेवी, बचावफळी- निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, मोनिका, मध्यफळी-निशा, वैष्णवी फाळके, नेहा, नवनीत कौर, सलिमा टेटे, सोनिका, ज्योती, ब्युटी डुंगडुंग, आघाडी फळी – लालरेमसियामी, संगीता कुमारी, दिपीका व वंदना कटारिया.









