वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर उतरणार असून या दौऱ्यात उभय संघांत 3 सामन्यांची हॉकी मालिका 18 मे पासून अॅडलेडमध्ये खेळविली जाणार आहे. या दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने 20 सदस्यांचा महिला हॉकी संघ जाहीर केला असून सविताकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
चीनमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाला सराव मिळविण्याच्या हेतूने हॉकी इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलिया अ संघाबरोबर 2 सामने खेळणार आहे. गोलरक्षक सविताकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून दीप ग्रेस एक्का उपकर्णधार राहिल. या संघात बिचूदेवी खरीबाम दुसरी गोलरक्षक म्हणून राहिल. बचाव फळीमध्ये दीप ग्रेस एक्का, निकी प्रधान, इशिका चौधरी, उदीता, गुरजीत कौर, मध्यफळीमध्ये निशा, नवज्योत कौर, मोनिका, सलिमा टेटे, नेहा, नवनीत कौर, सोनिका, ज्योती, बलजीत कौर, आघाडी फळीमध्ये वंदना कटारीया, लालरेमसियामी, संगीता कुमारी, शर्मीला देवी यांचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील हे हॉकी सामने अनुक्रमे 18, 20 आणि 21 मे रोजी खेळविले जातील. त्यानंतर 25 आणि 27 मे रोजी ऑस्ट्रेलिया अ बरोबर 2 सामने आयोजित केले आहेत. या दौऱ्यातील सर्व सामने अॅडलेडच्या मेटी स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत.









