वृत्तसंस्था / बिशेक (किर्जी प्रजासत्ताक)
पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या एएफसी 17 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाने आपली पात्रता सिद्ध केली आहे. पात्र फेरीच्या स्पर्धेतील येथे झालेल्या सामन्यात भारताने उझ्बेकचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला.
भारत आणि उझ्बेक यांच्यातील सामन्यात खेळाच्या पूर्वार्धात 40 व्या मिनिटाला प्रमुख प्रशिक्षक जोकिम अॅलेक्सेंटर्सन यांनी बोनिफिलीया शुलाईच्या जागी टी. बॅस्केला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरविले. तत्पूर्वी म्हणजे 38 व्या मिनिटाला उझ्बेकचे खाते शेखझोदा अलीकनोव्हाने उघडले होते. 55 व्या मिनिटाला बदली खेळाडू बॅस्केने भारताला बरोबरी साधून दिली. 66 व्या मिनिटाला अनुष्का कुमारीने दुसरा आणि निर्णायक गोल नोंदवून उझ्बेकचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. या विजयामुळे ग गटात भारतीय महिला फुटबॉल संघ सहा गुणांसह पहिल्या स्थानावर राहिला. या कामगिरीमुळे 2026 साली चीनमध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या एएफसी आशिया चषक कनिष्ठ महिलांच्या फुटबॉल स्पर्धेचे तिकीट भारतीय संघाने आरक्षित केले आहे. यापूर्वी म्हणजे 2005 साली भारतीय महिला फुटबॉल संघाने या स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती.









