बिश्केक (किर्गीस्तान)
2024 च्या एएफसी महिलांच्या ऑलिम्पिक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने यजमान किर्गीज प्रजासत्ताकचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले आहे. गेल्या चार दिवसांच्या कालावधीतील भारतीय महिला फुटबॉल संघाचा किर्गीज प्रजासत्ताकवरील हा दुसरा विजय आहे.
चालू आठवड्याच्या प्रारंभी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने किर्गीज प्रजासत्ताकचा 5-0 अशा गोलफरकाने पराभव केला होता. शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात पूर्वार्धात भारतीय संघाला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. तरी पण किर्गीज प्रजासत्ताकच्या खेळाडूंवर भारतीय महिला फुटबॉलपटूंनी आपले वर्चस्व शेवटपर्यंत राखले होते. या सामन्यात भारतातर्फे संध्या रंगनाथनने 2, तर अंजू तेमांग आणि बदली खेळाडू रेणू यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर 18 व्या मिनिटाला भारताचे खाते संध्याने उघडले. संध्याने किर्गीज प्रजासत्ताकच्या बचावफळीतील दोन खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचा गोल केला. या पहिल्या गोलानंतर भारतीय संघातील कार्तिकाला पंचांनी मैदानाबाहेर काढल्याने शेवटपर्यंत भारताला दहा खेळाडूंनिशी लढत द्यावी लागली. कार्तिकाकडून दांडगाईचा खेळ झाल्याने पंचांनी ही कारवाई केली. 24 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल अंजू तेमांगने नोंदविला. मध्यंतरापर्यंत भारताने किर्गीज प्रजासत्ताकवर 2-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर पाच मिनिटांच्या कालावधीत भारताचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल संध्या रंगनाथनने केला. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू रेणूने भारताचा 4 था आणि शेवटचा गोल हेडरद्वारे करून किर्गीज प्रजासत्ताकचे आव्हान संपुष्टात आणले.









