वृत्तसंस्था/ यनगॉन (म्यानमार)
महिलांच्या 20 वर्षाखालील वयोगटातील एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरु असलेल्या पात्र फेरीच्या ड गटातील सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने तुर्कीचा 7-0 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला. या विजयामुळे भारतीय महिला फुटबॉल संघ आता पात्रतेच्या समिप पोहोचला आहे.
भारत आणि तुर्की यांच्यातील ड गटातील झालेल्या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारतीय महिला फुटबॉल संघाने 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. या सामन्यातील विजयामुळे भारतीय महिला फुटबॉल संघाने ड गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. या गटामध्ये सरस गोल सरासरी भारताने अव्वल स्थान मिळविले आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेतील झालेला यजमान म्यानमार आणि इंडोनेशिया यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. यजमान म्यानमारने गुणतक्त्यात भारताप्रमाणे 4 गुण मिळविले असले तरी सरस गोल सरासरीवर ते दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत.
तुर्कीविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार शुभांगी सिंगने 7 व्या आणि 42 व्या मिनिटाला असे 2 गोल नोंदविले. भारतीय संघातील प्रमुख विंगर सुलंजना राऊलने 38 व्या आणि 94 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. एन. सिबानीदेवीने 14 व्या मिनिटाला, टी. चानू तोजेमने 35 व्या मिनिटाला तर पूजाने 65 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात तुर्कीला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. भारतीय महिला फुटबॉलपटूंनी या सामन्यात वेगवान आणि आक्रमक खेळावर अधिक भर दिल्याने तुर्कीच्या बचाव फळीवर तसेच गोलरक्षकावर शेवटपर्यंत दडपण राहिले. आता भारतीय महिला फुटबॉल संघाचा या पात्र फेरीच्या स्पर्धेतील शेवटचा सामना रविवारी यजमान म्यानमार बरोबर होणार आहे. रविवारचा सामना जिंकल्यास भारतीय महिला फुटबॉल संघ थायलंडमध्ये 2026 साली होणाऱ्या एएफसी महिलांच्या 20 वर्षाखालील आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचे तिकिट निश्चित करेल.









