वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियामध्ये 2026 साली होणाऱ्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल क्षेत्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पात्र ठरणाऱ्या भारतीय महिला फुटबॉल संघाला अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने 50 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस जाहीर केले आहे.
भारतीय महिला फुटबॉल संघाने या स्पर्धेसाठी पात्र फेरीमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. 2003 नंतर म्हणजेच तब्बल 22 वर्षांच्या विजनवासानंतर भारतीय महिला फुटबॉल संघाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे. 2022 साली सदर स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाल्याने साहजिकच भारतीय महिला फुटबॉल संघाला थेट प्रवेश देण्यात आला होता. पण कोरोना समस्येमुळे ही स्पर्धा रद्द करावी लागली होती. 2026 च्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी झालेल्या पात्रफेरीच्या स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाने पहिल्या सामन्यात मंगोलियाचा 13 गोलानी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने तिमोर लेस्टीचा 4-0, इराकचा 5-0 तसेच यजमान थायलंडचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने पूर्वतयारीकरता भारतीय महिला फुटबॉल संघासाठी 53 देशांचे राष्ट्रीय सराव शिबिर बेंगळूरमध्ये आयोजित केले होते. या शिबिरामध्ये स्थानिक संघाबरोबर सामनेही खेळविण्यात आले. उझ्बेकीस्तानबरोबर कांही मित्रत्वाचे सामने आयोजित केले होते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या आगामी स्पर्धेसाठी उझ्बेकचा महिला फुटबॉल संघही पात्र ठरला आहे.









