वृत्तसंस्था/ ढाका
20 वर्षाखालील वयोगटाच्या येथे सुरु असलेल्या महिलांच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात नेपाळने भारताचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या पराभवामुळे भारतीय फुटबॉल महिला संघाला हा सामना बरोबरीत राखणे जरुरीचा होता. या पराभवामुळे भारताला या स्पर्धेच्या अंतिम फेरीपासून वंचित व्हावे लागले.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बांगलादेशने तीन सामन्यातून 7 गुणासह पहिले स्थान तर नेपाळने 3 सामन्यातून 6 गुणासह दुसरे स्थान घेतले आहेत. भारतीय महिला फुटबॉल संघाला केवळ चार गणासह तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. मंगळवारच्या सामन्यात अपूर्णा नारझेरीने भारताचे खाते लवकरच उघडले. पण त्यानंतर नेपाळच्या खेळाडूंनी आक्रमक आणि वेगवान खेळाच्या जोरावर तीन गोल नेंदवत भारताचे आव्हान संपुष्टात आणले. अंजली चांद, प्रिती राय, अमिशा कर्की यांनी नेपाळतर्फे प्रत्येकी एक गोल नोंदवला. या सामन्यात भारतीय संघ गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या.









