वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2026 साली थायलंडमध्ये होणाऱ्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पहिल्यांदाच पात्र ठरलेल्या भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघाला अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे 25 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 2006 नंतर प्रथमच भारताचा महिला फुटबॉल संघ एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. भारतीय महिला कनिष्ठ फुटबॉल संघाचे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने खास कौतुक केले आहे. रविवारी येनगॉन येथे झालेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने यजमान म्यानमारचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत थायलंडमधील 2026 च्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक स्पर्धेचे तिकिट निश्चित केले. या सामन्यात भारतीय संघातील पूजाने 27 व्या मिनिटाला एकमेव निर्णायक गोल नोंदविला. पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाने इंडोनेशियाबरोबरचा सामना गोलशुन्य बरोबरीत राखला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने तुर्कीचा 7-0 असा एकतर्फी पराभव केला. पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय संघावर प्रतिस्पर्ध्यांकडून एकही गोल नोंदविला गेला नाही.
भारताच्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिला फुटबॉल संघासाठी 2024 च्या डिसेंबरपासून प्रशिक्षण सरावाचे शिबिर आयोजित केले होते. तुर्कीमध्ये झालेल्या लेडीज युथ चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपला सहभाग दर्शविताना हाँगकाँग आणि जॉर्डन संघाला पराभूत केले. भारताच्या 20 वर्षांखालील महिला फुटबॉल संघातील फुटबॉलपटूंकरिता वरिष्ट संघाबरोबर प्रशिक्षण सराव शिबिर आयोजित केले होते. त्यानंतर विदेशातील सामन्यांचा अनुभव मिळण्याच्या हेतुने विदेशी दौरे आयोजित केले होते. भारतीय कनिष्ठ महिला फुटबॉल संघासाठी 135 दिवसांचे सराव शिबिर आयोजित केले होते. अस्मिता फुटबॉल लीग स्पर्धा 2025-26 साठी खेळविली जाणार आहे. 13 वर्षांखालील वयोगटाच्या 2025-26 च्या अस्मिता फुटबॉल लीग स्पर्धेला गेल्या महिन्यात प्रारंभ करण्यात आला होता. ही स्पर्धा देशातील विविध ठिकाणी घेतली जात असून यामध्ये 26 राज्यातील सुमारे 400 संघ सहभागी झाले आहेत.









